महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर अद्याप सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. त्यामुळे अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता राज्याची सर्व सुत्रे राज्यपालांकडे गेली आहेत.तर आज (16 नोव्हेंबर) शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) महाआघाडीचे नेते राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी अधिक माहिती दिली.
राज्यात विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा सत्ता स्थापनेसाठी वेळ देऊ करण्यात आला. तरीही सत्ता स्थापन न झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेचे कामकाज कोश्यारी यांच्याद्वारे पार पडणार आहे. त्यात राज्यात अवकाळी पावसामुळे लाखो-करोडो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर गदा आली आहे. एवढेच नाही शेतकऱ्यांच्या मुलभुत प्रश्नांकडे सुद्धा कानाडोळा केला जात असल्याच्याच कारणास्तव आज नेतेमंडळी राज्यपालांना भेटणार आहेत.(महाराष्ट्राला शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे स्थिर सरकार मिळेल; शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास)
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतपिकांचे नुकसान भरपाई म्हणून 10 हजार कोटींच्या मदतीची शिफारस केली. त्याबाबत पंचनामे सुद्धा करण्यात आले. परंतु आता राज्यपालांकडे राज्याचे सर्व अधिकार असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी तातडीने रोख मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. तर राज्यपालांची भेट ही सत्ता स्थापनासाठी नसून शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी भेट घेणार असल्याचे नबाब मलिक यांनी सांगितले आहे.
तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपूर येथे दौऱ्यावर गेले असता त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ता स्थापनेबाबत विचारले असता त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येईल. तसेच, ते पाच वर्षे सत्तेत कायम राहिल असे म्हटले आहे.