शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात 'माझी ताकद 105 आमदार असूनही विरोधात बसणाऱ्यांना विचारा'
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत आणि कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्यात सुरु झालेला वाद इतक्यात काही थांबण्याची चिन्हे नाहीत. मी स्वतंत्र आहे. देशातील कोणत्याही शहरात, कोणत्याही ठिकाणी मी जाऊ शकते, असे ट्विटरच्या माध्यमातून सांगणाऱ्या कंगना रनौत हिला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Rau) यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सूचक पोस्ट लिहित म्हटले आहे की, 'माझी ताकद काय आहे हे 105 आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेत त्यांना विचारा'. संजय राऊत यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कंगना रनौत हिला इशारा देतानाच भाजपलाही चिमटा काढला आहे.

शिवसेना भाजप युतीद्वारे विधानसभा निवडणूक 2019 लढले. मात्र, समसमान सत्तावाटप आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हा शब्द भाजपने फिरवल्याचा आरोप करत शिवसेनेने युती तोडली. इतकेच नव्हे तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेना पक्षाच्या वतीने संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका राहीली आहे. त्यामुळे याच भूमिकेची आठवण करुन देत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तर, कंगना रनौत हिला सूचक इशारा दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी कंगना रनौत हिच्याबद्द अपशब्द वापरला. संजय राऊत यांनी वापरलेल्या शब्दावरुन कंगना रनौत हिच्या समर्थकांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. वापरलेल्या शब्दाबद्दल संजय राऊत यांनी माफी मागावी अशीही मागणी काहींनी केली. मात्र, त्या मुलीने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी त्याबाबत विचार करेन असेही संजय राऊत यांनी म्हटले. (हेही वाचा, Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी विचार करील - संजय राऊत)

कंगना रनौत हिने मुंबई शहर आता पाकव्याप्त कश्मीर झाल्यासारखे वाटत आहे, अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर कंगना रनौत हिच्यावर टीकेचा वर्षाव झाला. कंगना रनौत हिच्या याच विधानावरुन संजय राऊत आणि कंगना यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. मुंबई आणि महाराष्ट्राबाबत जर कोणी आक्षेपार्ह विधान केले तर ते खपवून घतले जाणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.