Shiv Sena Moves Supreme Court: 'आर्यन खानच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन, NCB च्या भूमिकेची चौकशी व्हावी'; शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव
Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) शिवसेनेच्या (Shiv Sena) एका ज्येष्ठ नेत्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खान प्रकरणाचा एनसीबीचा (NCB) तपास पक्षपाती असल्याचे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. या तपासादरम्यान आर्यनच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेना नेत्याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी संविधानाच्या कलम 32 अन्वये याचिका दाखल करताना सरन्यायाधीश एम व्ही रमण्णा यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

तिवारी यांनी म्हटले आहे की, एनसीबी गेल्या 2 वर्षांपासून पक्षपाती तपास करून चित्रपट कलाकार आणि मॉडेल्सना त्रास देत आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी म्हणाले की, कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित प्रत्येक प्रकरणाची दखल घेण्यास बांधील आहेत. एनसीबी नियमांचे उल्लंघन करत आहे. तिवारी यांनी आपल्या याचिकेमध्ये आर्यनच्या जामिनावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवण्याबाबतचाही उल्लेख केला आहे.

त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, सार्वजनिक सुट्टीचा हवाला देत जामिनाला स्थगिती देऊन आरोपीचा अपमान केला जात आहे. शिवसेना नेते म्हणाले की, आर्यनला गेल्या 17 दिवसांत बेकायदेशीररित्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. हे घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. एनसीबी आणि त्याच्या अधिकाऱ्यांवर काही सेलेब्सना टार्गेट करून सूड घेतल्याचा आरोप करत, शिवसेना नेत्याने ड्रग्स प्रकरणात केंद्रीय एजन्सी आणि समीर वानखेडे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: Aryan Khan च्या सुटकेसाठी गौरी खानची शपथ, मुलगा घरी येई पर्यंत खाणार नाही गोड)

दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला सामान्य कैद्यांप्रमाणे तुरुंगात राहावे लागत आहे. इथे आर्यनची ओळख कैदी क्रमांक N956 अशी आहे. आता बातमी आहे की, तुरुंगात आर्यनची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आर्यनला इतर कैद्यांपासून वेगळे एका विशेष बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे.