Uddhav Thackeray | Twitter

शिवसेनेमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या फुटीनंतर काल केंद्रीय आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला सोपावला आहे. यावरून ठाकरे गटाचे संतापलेले अनेक कार्यकर्ते सध्या ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री कडे निघाले आहेत. सकाळपासून अनेकांची भेट घेतल्यानंतर दुपारी स्वतः उद्धव ठाकरे कलानगरच्या प्रवेशद्वारावर आले. त्यांनी जमलेल्या शिवसैनिकांना गाडीतून संबोधित केले. यावेळी शिंदे गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आता शिवसेनेचं मध चाखलं पण आता मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे त्यामुळे डंखही आता खावा लागेल असं म्हणत निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचं आव्हान दिलं आहे.

मर्द असाल तर या चोरलेल्या शिवधनुष्यासह निवडणूकीत उतरा. आम्ही मशाल घेऊन येऊ. असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला पुन्हा आव्हान दिलं आहे. कदाचित मशाल चिन्ह देखील जाऊ शकेल पण निवडणूकीत गद्दारांना गाडल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. निवडणूकींच्या तयारी लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मागील इतिहास पाहता कधीच वादामध्ये चिन्हं समोरच्या पक्षाला दिलं  नव्हतं. ते गोठवण्यात आलं होतं. पण शिवसेनेच्या बाबतीत जे झालं ते पंतप्रधान कार्यालयाच्या कृपेने झालं असल्याचं म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी सध्या आपल्याकडे काहीही नाही. पण कुणीही ठरवून शिवसेना संपवू शकत नाही. त्यामुळे तुम्हीही खचून न जाता, न डगमगता या चोरट्यांना धडा शिकवा, त्यासाठी सज्ज व्हा अशी साद घातली आहे. नक्की वाचा: Shiv Sena Crisis: शिवसैनिकाच्या हातात खर्‍या अर्थाने पक्ष गेला आहे - दीपक केसरकर.

पहा ट्वीट

बाळासाहेबांनी 1969 साली कार्यकर्त्यांना गाडीच्या टपावर उभं राहून संबोधित केले होते. आज कलानगर बाहेर उद्धव ठाकरे यांनी देखील गाडीच्या सनरूफ मधून संबोधित केल्याचं पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दरम्यान उद्धव ठाकरे संबोधित करताना त्यांचे दोन्ही चिरंजीव आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.