लवकरच होऊ शकते Shiv Sena आणि VBA ची युती; Prakash Ambedkar यांनी दिले संकेत
Prakash Ambedkar (Photo Credits-ANI)

आगामी नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर, महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणार्‍या शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस व्यतिरिक्त नवा मित्र- वंचित बहुजन आघाडी (VBA) मिळू शकतो. व्हीबीएचे संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बुधवारी शिवसेनेसोबत संभाव्य युतीचे संकेत दिले. ‘शिवसेना अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच शिवसेना आणि व्हीबीए यांच्यातील युतीबाबत चर्चा करण्यासाठी मला फोन केला होता. आम्ही शिवसेनेसोबत युती करू शकतो, जी आता करायची की नाही हे ठरवायचे आहे,’ असे आंबेडकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी मला युतीबाबत चर्चेसाठी बोलावण्यासाठी फोन केला होता मात्र त्यांनी याबाबत बोलण्याची हिंमत दाखवली नाही.’ आंबेडकरांच्या या विधानामुळे शिवशक्ती आणि भीम शक्ती यांच्यातील संभाव्य संबंध पुन्हा एकदा जिवंत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी शिवसेनेने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी युती केली होती.

ते म्हणाले की, ‘मी उद्धव ठाकरेंना चांगले ओळखतो आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध होते. आता व्हीबीएशी करार करायचा की नाही हे उद्धव ठाकरेंवर अवलंबून आहे. आमच्याशी फक्त मैत्री करायची आहे का की युरी करायची आहे, हे उद्धव ठाकरे ठरवतील.

आंबेडकर पुढे म्हणाले की, व्हीबीएने काँग्रेससोबतही युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘प्रस्ताव यापूर्वीच दिला गेला आहे, मात्र काँग्रेसकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. युतीसाठी मी शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.’ (हेही वाचा: Money Laundering Case: ईडीने जप्त केल्या राष्ट्रवादीचे नेते Nawab Malik यांच्या अनेक मालमत्ता; जाणून घ्या सविस्तर)

व्हीबीएने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) सोबत करार केला होता आणि त्यांनी लढलेल्या जागांवर 7.08% मते मिळवली होती. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत, व्हीबीएने AIMIM सोबत युती केली नाही परंतु 4.6% मते मिळाली. व्हीबीए राज्य विधानसभा निवडणुकीत खाते उघडण्यात अपयशी ठरले.