सातारा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द
Shikhar Shingnapur (Photo Credits: FB)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज रात्रीपासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत काही कडक निर्बंध घालून देण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन होते की नाही याकडे प्रशासनाची करडी नजर असणार आहे. दरम्यान सद्य परिस्थितीमुळे शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) येथील शंभू महादेव यात्रा (Shambhu Mahadev Yatra) यंदा रद्द करण्यात आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा यंदा रद्द करण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

शिंगणापूर येथील महादेवाची यात्रेचा प्रमुख दिवस 23 आणि 24 एप्रिल 2021 आहे. या यात्रेसाठी दूरवरून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र यंदा कोरोनाने राज्यभरात हाहाकार माजविला असून दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाच्या नियमांचे पालन करत ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Coronavirus मुळे गेल्या 16 दिवसात महाराष्ट्र पोलीस दलातील 25 जणांचा मृत्यू

दरम्यान जिल्ह्यातून येणा-या भाविकांना आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्याने कोणीही यात्रेसाठी येऊ नये असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार, खाजगी बसेस 50 टक्के क्षमतेसह धावू शकतात. यावेळी, कोणताही प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाही. ही बस एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात आणि एका शहरातून दुसर्‍या शहरात धावणार नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. जर कोणी हा नियम पाळत नसल्याचे आढळले तर त्याला 10.000 दंड आकारला जाईल. जर इंटरसिटी किंवा इंटर डिस्ट्रिक्ट प्रवास करायचा असेल तर 14 दिवस विलगीकरणामध्ये राहावे लागेल. लोकल ट्रेन, मोनो आणि मेट्रोचा उपयोग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक अधिकारी तसेच डॉक्टर आणि आवश्यक सेवांशी संबंधित लोकच करू शकतात. राज्य सरकार व स्थानिक प्राधिकरणाच्या बसेस फक्त 50 टक्के क्षमतेसह चालविल्या जाऊ शकतात, ज्यामध्ये कोणताही प्रवासी उभा राहणार नाही.