राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आजपासून विदर्भ दौ-यावर; 'या' महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता
Sharad Pawar (Photo Credits: Getty)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आजपासून विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहेत. आपली चाणक्यनीती वापरून राज्यातील सत्तासंघर्षावर पडदा टाकणारे शरद पवार विदर्भातील या महत्त्वाच्या दौ-यादरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची महाविकासआघाडी स्थापन झाल्यानंतर नागपूरातले पहिलेच हिवाळी अधिवेश असल्याने विशेष तयारी करण्यात आली आहे. विदर्भातील जनतेच्या मागण्यांबाबत सरकारला मार्गदर्शन करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेचा पूर्व आणि पश्चिम विदर्भात विस्तार करण्यासाठी पवार दोन दिवस नागपूरात थांबणार आहे.

बारामती आणि पुणे जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून आज संध्याकाळी शरद पवार नागपुरात दाखल होणार आहेत. ते संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभय सभागृहांतील आमदारांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून, त्यात राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावावर ते शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने 'मटा'शी बोलताना वर्तवली आहे. तसेच तीनही पक्षांमध्ये सरकार चालवताना उत्तम समन्वय कसा राहील याबाबत पवार हे नागपूरभेटीत मित्र पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत करण्याचे संकेत आहेत.

हेदेखील वाचा-देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता जाताच महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या टीकेतील महत्त्वाचे मुद्दे

तसेच येत्या 19 डिसेंबर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या 85 व्या वाढदिवस नागपूरात महाविकासआघाडी करुन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात शरद पवार यांचे राजकीय कसब कामी आले आणि भाजपच्या आक्रमक राजकारणाला पायबंध बसला. विशेष म्हणजे राज्यात काँग्रेस नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असताना आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताबाजारात सर्वात छोटा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. देशभरात राजकीय वर्तुळासाठी हा मोठा आश्चर्यकारक क्षण होता. पण, असे घडले खरे. त्यामुळे या सरकारकडे देशाचे लक्ष लागले आहे.