शरद पवार यांचा पास पाचव्या रांगेतील नव्हताच; 'V' मुळे राष्ट्रवादीचा मोठा गैरसमज, जाणून घ्या सत्य
शरद पवार (संग्रहित संपादित प्रतिमा)

30 मे रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची आणि इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. देशविदेशातील तब्बल 6000 पाहुण्यांंच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. विरोधी पक्ष नेत्यांनाही या सोहळ्याला निमंत्रित केले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पाचव्या रांगेत स्थान दिल्याचा कांगावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. शरद पवारही याच रागामुळे सोहळ्यास उपस्थित राहिले नाहीत असे वृत्त अनेक माध्यमांनी दिले. मात्र आता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे उघडकीस आले आहे.

राष्ट्रपती भवनाकडून शरद पवार यांना ‘V’ रांगेचा पास पाठवण्यात आला होता. शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा पास रोमन V म्हणजेच पाच असल्याचे वाटले. याच कारणामुळे शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान दिले, त्यांचा अपमान केला असा आरोप झाला. मात्र राष्ट्रपती भवनातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा पास व्हीआयपी (VVIP) लोकांसाठी असलेल्या म्हणजेच पहिल्या रांगेतील होता. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा: नरेंद्र मोदी यांच्या शपथ सोहळ्याला शरद पवार यांची अनुपस्थिती; 'हे' आहे पडद्यामागचं कारण)

या व्हीआयपी रांगेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मुलायम सिंह, गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादीचे नेते शंकरसिंह वाघेला अशी दिग्गज मंडळी बसली होती. शरद पवार यांनाही याच रांगेत स्थान देण्यात आले होते. मात्र शरद पवार यांचा V अद्याक्षरावरून गोंधळ झाल्याने ते या शपथ समारंभाला उपस्थित राहिले नाहीत असे सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.