Mumbai: बाइकचा हॉर्न वाजवला मुलाने बापाला गमवावा लागला जीव; घाटकोपरमधील धक्कादायक घटना
Image used for represenational purpose (File Photo)

आजकाल कधी कोणाचे डोके कधी फिरेल काही सांगता येत नाही. बाइकचा हॉर्न वाजवल्या कारणाने 57 वर्षीय बापाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घाटकोपर जवळील (Ghatkopar) परिसरात घडली. यात बाइकस्वार आणि पादचा-यांमध्ये झालेल्या बाचाबाचीत जखमी झालेल्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिळकनगर पोलिसांच्या तपासानुसार, घाटकोपरच्या मोहन बंजारा भागात राहणारे दीपक चावरिया (29) आणि त्याचा भाऊ मनोज चावरिया (32) कामानिमित्त बाइकवरुन जात होते. त्यावेळी रस्त्यावर उभे असलेले संदीप पारचा (28) आणि त्याचे वडिल पालसिंह पारचा (70) यांच्याजवळ दीपक याची बाइक येताच त्याने त्यांना बाजूला हटण्यासाठी जोरात हॉर्न वाजवला. त्यावेळी नाराज झालेल्या संदिपने हॉर्न न वाजवण्यास सांगितले. यात दीपक आणि संदीपमध्ये बाचाबाची झाली. हा प्रकार दीपकच्या घरापासून अगदी जवळच सुरु होता. त्यामुळे दीपकच्या घरी याची खबर लागताच, दीपकचे वडिल मनोहर चावरिया (57) आणि त्याची बहिण पूजा (36) तेथे आल्या.

हेही वाचा- धक्कादायक! पुण्यात हॉटेलसमोर लघुशंका करण्याच्या वादातून दोन गटात मारामारी; तरुणाचे अपहरण करून खून

यात झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले. यात रागाच्या भरात संदिप याने चाकूने दिपकच्या वडिलांवर वार केले. यात मनोहर चावरिया गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. या मारहाणीत पूजा, मनोज आणि दीपकला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावरही राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी संदिप पारचा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.