भारतामध्ये दहशतवादी घुसल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती; दिल्लीसह महत्त्वाच्या शहरात हाय अलर्ट
Terrorist (File Image)

मागील काही महिन्यांपासून कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यानंतर भारत- पाक मध्ये निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे आता भारतामध्ये दहशतवादी घातपात घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं गुप्तचर यंत्रणेकडून सूचित करण्यात आलं आहे. मटाच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये 12 दहशतवादी घुसले असून पाकव्याप्त कश्मीरमध्ये 'जैश ए मोहम्मद' च्या 3-4 प्रशिक्षित दहशतवाद्यांच्या गटाला दिल्ली, कश्मीर, पंजाब येथे पठवण्यात आले आहे. काही कोड वर्ड्सचा वापर करून दहशतवादी भारतामध्ये घुसल्याची माहिती आता समोर आली आहे.

गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांमध्ये कश्मिरी, अफगाणी आणि काही पाकिस्तानी तरुणांचा समावेश आहे. या दहशतवादी टीममध्ये काही आत्मघातकी दहशतवादी देखील आहेत. हे दहशतवाद्यांनी सुरक्षित मार्गांनी दिल्लीत घुसखोरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. असं मटाने दिलेल्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या या माहितीनंतर जम्मू कश्मीर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आहेत.