Sanjay Raut On Shinde Camp: 'अयोध्या आंदोलनात शिवसेना नव्हती' चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावरून संजय राऊतांनी 'शिंदे गटाला' घेरत दिलं शिवसेना प्रमुखांच्या अपमाना विरोधात मंत्री पदाच्या राजीनाम्याचं आव्हान
'मींधे गटात कोणी खऱ्या आईचे दुध प्यायलेला आहे का जो शिवसेना प्रमुखांच्या अपमाना विरोधात मंत्री पदाचा राजीनामा देईल? शिंदे यांना हा भाजपाचा दावा मान्य आहे ? असेही राऊतांनी ट्वीट करत विचारले आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून शिंदे गट विरूद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यामधील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले आहेत. पण आता एक भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या एका वक्तव्यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर पुन्हा निशाणा साधला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'अयोध्या आंदोलनात शिवसेना नव्हतीच' असा दावा केला आहे. पण हे विधान म्हणजे शिवसेना प्रमुखांचा अपमान आहे असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मुलाखती मध्ये बोलताना , “त्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो याचा अर्थ काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? हे सरसकट घेण्याची गरज नाही. कारसेवक हे हिंदू होते. कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की हेच करू शकतील आणि त्यांनी केलं ते. ज्यांनी बाबरी मशिद पाडली, ते शिवसैनिक नव्हते."
संजय राऊतांनी या बाबत प्रतिक्रिया देताना आज जी भाजपा सत्तेत बसली आहे, त्यासाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यावेळच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. बाळासाहेब ठाकरे बाबरी पाडल्याच्या प्रकरणात लखनौला CBI विशेष न्यायालयात हजर झाले होते त्यांना प्रमुख आरोपी बनवले होते. हे भाजपाच्या नेत्यांना माहिती नाही का? ज्यांना तुम्ही विकत घेतलंय, त्यांच्या तोंडाला कुलूप का लागलंय?” असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. Eknath Shinde Ayodhya Visit: अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भव्य स्वागत .
दरम्यान 'मींधे गटात कोणी खऱ्या आईचे दुध प्यायलेला आहे का जो शिवसेना प्रमुखांच्या अपमाना विरोधात मंत्री पदाचा राजीनामा देईल? शिंदे यांना हा भाजपाचा दावा मान्य आहे ? असेही राऊतांनी ट्वीट करत विचारले आहे.