Sanjay Raut & Ashish Shelar Meet: आशिष शेलार यांच्यासोबत भेटीच्या निव्वळ अफवा; संजय राऊत यांनी केला खुलासा
Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात भेट झाल्याची चर्चा काल राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. मात्र याबाबत आता संजय राऊत यांनी स्वत: खुलासा केला आहे. आमच्यात कोणतीही भेट झालेली नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो होतो. पण ते उघडपणे आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं संजय राऊत आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. तसंच आमच्या भेटीच्या निव्वळ अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

"वैचारिक आणि राजकीय मतभेद असले तरी समोर आल्यानंतर बोलणे होते. गळाभेटही होते. राज्य आणि देशाचं राजकारण हिंदुस्तान-पाकिस्तान सारखं नाही. गोळी मारा आणि संपवून टाका. त्यामुळे अशाप्रकारच्या अफवा पसरवून काही होणार नाही. उद्यापासून विधानसभेचे सत्र सुरु होत आहे. त्यापूर्वी अफवा पसरवल्या जात आहेत. पण जेवढ्या तुम्ही अफवा पसरवाल तेवढे अधिक आम्ही एकत्र येऊ," असं राऊत म्हणाले.

ज्यांना माझ्यापासून त्रास आहे. माझ्या कामातून, बोलण्या-लिहण्यातून ज्यांना त्रास होतो. ते माझ्याबद्दल अशा अफवा पसरवत असतात. मी त्या अफवांचे देखील स्वागत करतो, असेही ते म्हणाले. (Sanjay Raut, Ashish Shelar Meet: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात भेट? राज्याच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा)

त्याबरोबर त्यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाबद्दलही भाष्य केलं. महाविकास आघाडी सरकार, शिवसेना यांचे राज्याच्या, जनतेच्या हिताचे बरेच मुद्दे असू शकतात. त्यावर चर्चा होणं, निर्णय होणं, कायदे मंजूर होणं गरजेचं आहे. परंतु, विरोधी पक्षाने अधिवेशन दोन दिवस पूर्णपणे चालू दिलं पाहिजे. विरोधी पक्षाला महाराष्ट्राच्या हिताची काळजी असेल तर ते कामकाज दोन दिवस व्यवस्थितपणे चालू देतील, असंही ते म्हणाले. तसंच अधिवेशन केवळ दोन दिवसांचं असल्याने गोंधळात ते वाहू देऊ नये, अशी जनतेची इच्छा असल्याचंही ते म्हणाले.