सांगली: राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा निर्घृण खून
Dattatraya Patole, Sangli | (File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे (वय 41, रा. वाघमोडेनगर) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिरज औद्योगिक वसाहत (Miraj MIDC) परिसरात असलेल्या हॉटेल अशोका (Hotel Ashoka) समोर रोहिणी ऍग्रोटेक कोल्ड स्टोअरेज (Rohini Agrotech Cold Storage) मध्ये येथे शुक्रवारी (10 जुलै) दुपारी ही घटना घडली. तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी दत्तात्रय पाटोळे (Dattatraya Patole) यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा मृत्यू झाला. आर्थिक वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

प्राप्त माहितीनुसार, दत्तात्रय पाटोळे हे आपल्या दुचाकीवरुन शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास मिरज औद्योगिक वसाहतीत निघाले होते. त्यांची दुचाकी हॉटेल अशोका समोर येताच तीन हल्लेखरांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते दुचाकीवरुन खाली पडले. हल्लेखोर हल्ला करतच होते. त्यातूनही उठून जीव वाचविण्यासाठी ते इकडेतिकडे पळू लागले. अखेरचा प्रयत्न म्हणून त्यांनी रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाटलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. डोक्यावर आणि शरीराव धारधार शस्त्राने वार केल्याने पाटोळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पाटोळे यांना वाचविण्यासाठी स्टोरेजमधील एक कामगार पुढे आला पण हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार केला. यात तो कामगार जखमी झाल्याचे समजते. (हेही वाचा, जळगाव: मुक्ताईनगर पंचायत समिती माजी सभापती डी. ओ. पाटील ह्यांची हत्या; धारधार शस्त्राने चिरला गळा)

घटनेची माहिती मिळताच, कुपवाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाटोळे यांची हत्या करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार दत्तात्रय पाटोळे हे औद्योगिक वसाहतीत मनुष्यबळ (कामगार) पुरविण्याीच कंत्राटे घेत असत. ते राजकारणात सक्रीय होते. अलिकडेच झालेल्या सांगली महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांमध्ये त्यांचा समावेश होता.