Buldana Video: दरोडेखोर मस्तवाल, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे दुकानात घुसून दुकान मालकाची हत्या, थरार CCTV मध्ये कैद
Robbery | (Photo Credit: Archived, edited, representative images)

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली (Chikhali) तालुका दरोडेखोरांच्या मस्तवाल आणि दहशतीने हादरुन गेला आहे. चिखली शहरातील जयस्तंभ परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर मंगळवारी रात्री (16 नोव्हेंबर) सशस्त्र दरोडा Robbery at Chikhali in Buldhana) पडला. दोन दरोडेखोरांनी दुकानात शस्त्रांसर प्रवेश केला. दरोडेखोरांनी थेट दुकान मालक कमलेश पोपट यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कमलेश पोपट (Kamlesh Popat) गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावत तपास सुरु केला आहे.

घटनेबाबत माहिती अशी की, आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक कमलेश पोपट हे दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. त्यांनी दुकानाचे मुख्य शटर बंद केले होते. केवळ बाजूचे छोटे शटर सुरु होते. याच शटरमधून दुचाकीवरुन आलेले दोन दरोडेखोर दुकानात शिरले. हे दोन्ही दरोडेखोर ग्राहक असल्याचा बहाना करुन दुकानात शिरले. त्यांनी काऊंटरजवळ जात गल्ल्यातील रोख रकमेला हात घातला. दरम्यान, कमलेश पोपट यांनी दरोडेखोरांना विरोध केला. या वेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी कमलेश यांच्यावर शस्त्रास्त्रांनी हल्ला केला. यात कमलेश यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Pune Crime: पुण्यामध्ये डोक्यात वार करून 70 वर्षीय महिलेची हत्या, 2 लाखांचे दागिनेही लांबिवले)

ट्विट व्हिडिओ

घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या कमलेश यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. पाठिमागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने अवैध धंदे जोरावर आहेत.