एकाचवेळी 200 कार व 1000 प्रवासी घेऊन जाणारी, Ro-Ro Ship जानेवारी अखेर होणार मुंबईत दाखल
रो-रो जहाज (प्रातिनिधिक प्रतिमा)

मुंबई (Mumbai) हे केवळ देशातीलच नव्हे तर, संपूर्ण जगातील सर्वात दाट लोकवस्तीच्या शहरांपैकी एक शहर आहे. म्हणूनच इथे रस्ते आणि सार्वजनिक वाहतुकीची नेहमीच समस्या भेडसावत असते. मात्र आता मुंबईला वाहतुकीसाठी एक नवीन माध्यम उपलब्ध होत आहे. थोड्याश्या विलंबानंतर का होईना, मात्र जानेवारीच्या शेवटी मुंबईला पहिले रो-रो जहाज (Ro-Ro Ship) मिळणार आहे.

हे जहाज प्रवासी, कार आणि बस यांना घेऊन समुद्र मार्गाने मुंबई ते नवी मुंबई अशी वाहतूक करणार आहे. मुंबईचे हे पहिले रो-रो जहाज,  डिसेंबरच्या अखेरीस कार्यान्वित होणे अपेक्षित होते. परंतु ग्रीसकडून येण्यास विलंब झाल्याने आता हे जहाज जानेवारीच्या शेवटी मुंबईत दाखल होईल.

महत्वाचे म्हणजे या जहाजाची क्षमता अफलातून आहे. या जहाजाची नियमित दिवसांमध्ये प्रवासी क्षमता सुमारे 1000 असेल, तर खराब हवामानाच्या परिस्थितीत हे जहाज 500 प्रवासी घेऊन जाण्यास सक्षम असेल. विशेष म्हणजे, या जहाजातून एकाच वेळी बर्‍याच बसेस आणि 200 पेक्षा जास्त मोटारी देखील वाहून नेल्या जाऊ शकतात. एकदा का हे जहाज कार्यान्वित झाले, की रो-रो केवळ रहदारी कमी करण्यातच मदत करणार नाही, तर लोकांना वाहतुकीचे वेगवान आणि सुलभ साधन देखील प्रदान करणार आहे. (हेही वाचा: समुद्रपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी भारतातील सर्वात मोठे जहाज मुंबईकरांच्या सेवेत; पहा कुठे करू शकाल सफर)

रो-रो जहाज सुरू झाल्यावर, बालाजी मंदिर- नेरूळ, डी वाय पाटील स्टेडियम, वंडर पार्क आणि ठाणे खाडी या ठिकाणी  जाण्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे. मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या दरम्यानही रो-रो वाहतूक सेवा सुरु होणार आहे.हे जहाज मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर मार्चपूर्वी ही सेवा सुरू करण्यात येईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले.