नाशिक मधील Independence Bank वर RBI चे निर्बंध; पैसे काढण्यावर बंदी
RBI | (File Image)

नाशिक (Nashik) मधील इंडिपेंडेंस को-आपरेटिव्ह बँकेतून (Independence Co Op Bank Limited) पैसे काढण्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बंदी घातली आहे. ही बंदी सहा महिन्यांसाठी असणार आहे. सध्याची बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला असून बचत किंवा चालू खात्यातून कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र ठेवीदार कर्जफेड करु शकतात. परंतु, त्यासाठी देखील काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.

काल (बुधवार, 10 फेब्रुवारी) बँकेची कार्यालयनी वेळ संपल्यानंतर निर्बंध लादले गेले. त्याअंतर्गत आरबीआयच्या मंजूरीशिवाय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कर्ज देणे, कर्जाचे नुतनीकरण करणे शक्य होणार नाही. याशिवाय कोणतीही गुंतवणूक किंवा रक्कमेची फेड करता येणार नाही. (RBI Cancels License Subhadra Local Area Bank: कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द; आरबीआय कडून मोठी कारावाई)

परंतु, बँकींग व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सर्व बंधने बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत सुरु राहतील. मात्र बँकेच्या आर्थिक परिस्थिती पाहून निर्बंधांमध्ये दुरुस्ती करण्यात येईल, असे आरबीआयने स्पष्ट केले.

दरम्यान, बँकेतील 99.88 टक्के ठेवीदार हे पूर्णपणे डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेअंतर्गत आहेत. डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे डीआयसीजीसी. यांच्याकडून बँकेमध्ये 5 लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित ठेवण्याची हमी दिली जाते. या बँकेतील जमा असलेल्या रक्कमेवर इंश्योरन्स देखील दिला जातो. यामुळे बँक बुडाल्यास खातेदाराला किमान 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.