भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलात बदल्या करण्यासाठी गैर प्रकार झाल्याचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर पलटवार केला आहे. दरम्यान, गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या भाजपच्या एजंट आहेत. त्यांनी 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर राज्यातील राजकारणात थिणगी पडण्याची शक्यता आहे.
नुकतीच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान राजकीयदृष्ट्या करता आले नाही, म्हणून आता अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य सरकारची बदनामी देवेंद्र फडणवीस करत आहेत. तसेच “फडणवीसांना सादर केलेला फोन टॅपिंगचा अहवाल माझ्याकडे आहे. कोणताही मंत्री आपल्या अधिकारात या बदल्या करु शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. त्यासाठी एक कमिटी आहे. जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांसाठीदेखील समिती आहे. त्यामुळे फडणवीस दिशाभूल करत आहेत,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. हे देखील वाचा-
दरम्यान, "रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन फोट टॅपिंग केले आहे, असे फडणवीस सांगत आहेत. परंतु, रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे 30 जणांचे फोन टॅप केले आहे. हा गुन्हा आहे. ज्यावेळी महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे संकट होते. त्यावेळी रश्मी शुक्ला सगळ्यांचे फोन टॅप करत होत्या. त्या भाजपच्या एजंट या नात्याने काम करत होत्या. ज्या अहवालाचा उल्लेख फडणवीस करत आहेत, त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता टॅपिंग सुरु होते. तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे 80 टक्के बदल्या झालेल्या नाहीत", असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहेत.