मनसेतील 'ते' गद्दार कोण? राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील वक्तव्यानंतर पक्षातील अनेकांचे धाबे दणाणले
Raj Thackeray | (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. चार दिवसांचा असलेला दौरा आटोपता घेत ते मुंबईकडे रवाना होत आहेत. मात्र, तत्पूर्वी त्यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्यांनी आपल्याच पक्षातील काही लोक गद्दार आहेत. त्यांची नावे मला कळली आहेत. जे गद्दार आहेत. त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे, असे उद्गार काढले आहेत. त्यामळे मनसेतील नेमके गद्दार कोण? याबाबत अनेकांच्या भूवया उंचावल्या असून, गद्दारांच्या यादीत आपले तर नाव नाही ना.. या विचाराने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

या वेळी बोलताना ''मी पक्षाच्या बैठकीसाठी आलो आहे. काही कारणांमुळे मला हा दौरा आटोपता घेत परतावं लागत आहे. 15 दिवसांनंतर मी पुन्हा या दौऱ्यावर परत येणार आहे. त्यावेळी विविध मुद्द्यांवर विस्ताराने बोलणार आहे. पक्षाच्या बैठकीत मी विविध कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्या लक्षात आले की, पक्षातीलच काही लोक गद्दार आहेत. जे प्रसारमाध्यमांना चुकीच्या बातम्या देतात. त्यांची नावं मला कळली आहेत. अशा लोकांची मी पक्षातून लवकरच हाकालपट्टी करणार आहे', असे राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

मनसेनं बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध आंदोलन केले पण आता तर अफगाणी घुसखोर सापडले आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. या विषयावर मला सविस्तर बोलायचेच आहे. पुढच्या 15 दिवसांमध्ये मी परत येईन तेव्हा सविस्तर बोलेल. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षाबद्दल चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या आहेत. इतक्या की राज ठाकरे कुठे आहेत. कुठे जाणार आहेत. कोणाला भेटणार आणि कुठे सभा घेणार आहेत, याबाबत कसलीही माहिती नसताना प्रसारमाध्यमांतून काहीही बातम्या सुरु असतात. आपल्याच पक्षातील काही लोक या बातम्या पसरवत असतात. या सर्वांवरच मला कारवाई करायची आहे, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, झेंडा बदलला भूमिका नाही, काही लोक असा बदल करत सत्तेत गेले; राज ठाकरे यांचा शिवसेनेला टोला)

चुकीच्या बातम्यांमुळे राज ठाकरे इतके संतापले होते की, 'गद्दारांनी माझ्या सभेतूनदेखील बाहेर जावं' असं म्हटलं. येत्या एकदोन दिवसांमध्ये मी या गद्दारांची नावे समोर आणणार आहे आणि पक्षातून त्यांची हकालपट्टीही करणार असल्याचे राज यांनी ठणकाऊन सांगितले. त्यामुळे मनसेतील नेमके गद्दार कोण आणि राज ठाकरे हे नेमके कोणावर कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.