देशात उद्या (19 मे) लोकसभा निवडणूकीचा (Loksabha Elections 2019) शेवटचा टप्पा (7th Phase) पार पडणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळातील पहिली पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देणे टाळले. पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तर भाजपा अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांनी दिली. त्यानंतर मोदींवर चहुबाजूने टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील आपल्या खास शैलीत मोदींच्या या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेचा समाचार घेतला. खोचक पण सूचक असं ट्विट करत राज ठाकरे यांनी लिहिले की, "पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’!"
राज ठाकरे यांच ट्विट:
पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’ !#PMPressMeet #PMPressConfere
— Raj Thackeray (@RajThackeray) May 17, 2019
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या खोचक ट्विटनंतर दादर शिवाजी पार्क येथील आंबा महोत्सवात देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. ('पाच वर्षात सरकारने भरीव काम केले', सत्ताकाळातील अखेरच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच पत्रकार परिषद)
'ज्या पत्रकार परिषदेत मोदी बोलले नाहीत त्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बरं. पत्रकारांना सामोरं जायला आपला पंतप्रधान घाबरतो हे दुर्दैव आहे. अमित शहा यांनाच बोलायचे होते तर हे आले तरी कशाला? पाच वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींची ही मानसिक हार आहे. यांच्यामध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्यास हिंमत नाही. पंतप्रधान का घाबरतात याचे उत्तर त्यांनी द्यावे,' अशा शब्दात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसंच राज यांनी यावेळी अमित शहा यांना देखील लक्ष्य केलं.
राज यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप पक्षाविरुद्ध घेतलेला आक्रमक पवित्रा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात, सभात दिसून आला. यात त्यांनी मोदी, शहांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.