भारतात सध्या फक्त 'मोदी लिपी': राज ठाकरे
Raj Thackeray | (Photo credit : Facebook)

भारतात एकेकाळी मोडी लिपी (Modi Script ) चालत असे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे केशव सिताराम ठाकरे अशी मोडी लिपीत सही करत असत. त्या काळी देशात मोडी लिपी चालत असे. आता केवळ मोदी लिपी (Modi Lipi) दिसते, अशी मिश्कील टोलेबाजी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर भाष्य केले आहे. ज्येष्ठ सुलेखनकार (Calligrapher) अच्युत पालव (Achyut Palav) यांच्या पुस्तकाचे आज मुंबईत प्रकाशन झाले. या वेळी राज ठाकरे बोलत होते.

या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी अच्युत पालव यांच्या सुलेखन कलेचे कौतुक केले. पालव यांचे सुलेखन क्षेत्रात असलेले काम अत्यंत उच्च दर्जाचे आणि तितकेच आफाट आहे. त्यामुळे त्यांची किर्ती जगभरात आहे. ही प्रसिद्धी, किर्ती एका रात्रीत येत नसते. त्यासाठी तितके घासावे लागते. अनेक अडचणींवर मात करत पालव यांनी हे कार्य जोमाने केले, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले. 26 जुलै रोजी मुंबईत जो पाऊस पडला या पावसात पालव यांचे साहित्य भिजले. यात अनेक कलाकृती, प्रमाणपत्रं भिजली. परंतू, तरीही पालव यांनी आपले काम सुरुच ठेवले, अशी आठवणही राज ठाकरे यांनी सांगितली.

अच्युत पालव यांना आरेतुरे करता येईल. तितके आमचे संबंध घनिष्ठ आहेत. परंतू, सार्वजनिक ठिकाणी घरचे संबंध घरी ठेवले पाहिजेत असे सांगत राज ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात पालव यांचा उल्लेख आहोजाहो असे करत आदरार्थी केला. या वेळी बोलताना स्वत:चं अक्षर चांगलं असणं ही खूप मोठी गोष्ठ असते. वयाच्या पन्नाशी-साठीमध्ये त्याचा फार आनंद होते, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, माझे हस्ताक्षर चांगले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील यांच्यामुळे माझे अक्षर चांगले घडले. आज पाण प्रगत तंत्रज्ञान वापरत कॉम्प्युटरचा कितीही वापर केला तरीही जे ओरिजनल ते ओरिजनलच असते, असेही ठाकरे म्हणाले. या विधानालाच जोडून आजही आपल्याकडे वॉल्ट डिस्ने यांच्या काही ओरिजनल कालकृती असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. (हेही वाचा, मनसेचे पक्ष चिन्ह बदलले? राज ठाकरेंनी हटवला झेंडा, उरले फक्त इंजिन)

अक्षराबाबत बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही मिष्कील भाष्य केले. पूर्वी देशात मोडी लिपी असे आज देशात मोदी लिपी असल्याचे ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि त्याच्या झेंड्याबाबत विविध चर्चा प्रसारमाध्यमांतून रंगल्या आहेत. येत्या 23 जानेवारी या दिवशी राज ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याच्या भाषणात राज ठाकरे काय भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता आहे.