'पवन' आणि 'अम्फन' चक्रीवादळामुळे मुंबई शहरात तसेच उपनगरांत मध्यम स्वरुपाचा पाऊस
'स्कायमेट' या खासगी वेधशाळेने बुधवारी मुंबई, पुणे, नाशिक भागात पावसाचा अंदाज वर्तवला होता. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'पवन' आणि 'अम्फन' या चक्रीवादळामुळे या भागात पाऊस कोसळला.
आज पहाटे ठाणे, दादर, कुर्ला, सायन तसेच मुंबई शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 'स्कायमेट' या खासगी वेधशाळेने बुधवारी मुंबई, पुणे, नाशिक भागात पावसाचा अंदाज वर्तवला होता. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'पवन' आणि 'अम्फन' या चक्रीवादळामुळे या भागात पाऊस कोसळला. दरम्यान, हवामान विभागाने संभाव्य स्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
'पवन' आणि 'अम्फन' या चक्रीवादळांमुळे कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी गुरुवारी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा - अरबी समुद्रात एकाच वेळी पवन, अम्फन अशा दोन चक्रीवादळाचा धोका; मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता)
काही दिवसांपूर्वी 'क्यार' आणि 'महा'चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात अशाच स्वरुपाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते एकाच वेळी 2 वादळे येणं ही अतिशय दुर्मिळ स्थिती आहे. यावर्षी अरबी समुद्रात चार तर बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे निर्माण झाली.
'पवन' चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर हे वादळ प्रथम उत्तर पश्चिम दिशेला व त्यानंतर पश्चिम दिशेने पुढे सरकेल. तसेच 'अम्फन' वादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण होणार आहे. या दोन्ही वादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरातच्या विविध भागांत येत्या 12 तासांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.