PM Narendra Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर, काँग्रेस दाखवणार काळे झेंडे
Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा पुणे दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. येत्या 6 मार्च रोजी नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी काँग्रेस (Congress) त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो (Pune Metro) चे उद्घाटन (Pune Metro) होणार आहे. पुणे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. याच दौऱ्या पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करत निषेध नोंदवणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढवला होता. प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये कोरोना पसरविण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच जबाबदार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. मुंबई आणि महाराष्ट्रात असलेल्या परप्रांतीय कामगारांना मोफत तिकीट देऊन काँग्रेसने उत्तर प्रदेश, बिहारला पाठवून दिले अशा आशयाचे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली असून निदर्शने करणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Russia Ukraine War: नाव कमावू नका, विद्यार्थ्यांचे प्राण वाचवा, खासदार सुप्रिया सुळे यांचे मोदी सरकारला आवाहन)

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा वेळापत्रक

  • 6 मार्च रोजी सकाळी 10:30मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन
  • महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा (पंतप्रधानांच्या हस्ते)
  • मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर पंतप्रधानांची उपस्थिती
  • गरवारे महाविद्यालय येथील मेट्रोस्टेशनवरुन पंतप्रधान आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.
  • मेट्रो उद्घाटनानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोठी सभा
  • एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरील सभेनंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला रवाना होतील.
  • लवळे येथील कार्यक्रम समाप्त होताच दुपारी 3 च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी अशी काँग्रेसची मागणी आहे. येत्या सहा मार्च रोजी पुणे मेट्रोच्या उद्घानावेळी पंतप्रधान पुणे दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यासाठीच काँँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात निदर्शने करणार आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि काँग्रेस नेते मोहन जोशी म्हटले आहे.