मद्यपान करुन शिवशाही बस चालवणाऱ्या एसटी बस चालकाची तातडीने एसटीच्या सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote) यांच्या आदेशावरुन एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अमोल चोले असे या मद्यपी चालकाचे नाव आहे. त्याचबरोबर यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची देखील नोकरीतून कायम स्वरुपी हकालपट्टी करण्यात येईल, अशी कडक नियमावली प्रशासनाने राबवण्याचे आदेश रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, पुण्याहून उस्मानाबाद येथे जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये एसटीचा मद्यपी चालक चढला आणि त्याने बस चालवायला सुरुवात केली. हा चालक नशेत असल्याने त्याने पुण्यात सिमला ऑफिस चौकात बस भिंतीला धडकवली. यामुळे 27 प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र बस चालू ठेवून बसखाली उतरलेल्या शिवशाही बसचालक आणि कंडक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित एसटी चालकाला बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. (पुणे: शिवशाही बसच्या बेजबाबदार चालकामुळे 27 प्रवाशांचा जीव टांगणीला; दुर्घटना टळली मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर)
तसंच प्रवाशांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे आपले काम असून प्रवाशांच्या विश्वासाला कोठेही तडा जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे रावते म्हणाले. त्यामुळे अशा प्रसंगांमुळे एसटीची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवी, असेही रावते यांनी सांगितले.