पुणे: लॉकडाऊन दरम्यान रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील नाना पेठे भागातील मानुषा मशिदीजवळ आज पहाटे घडली. येसूदास एम. फ्रान्सिस असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री 1 वाजता फ्रान्सिस यांची प्रकती खालावली होती. यामुळे फ्रान्सिसच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली होती. तसेच पोलिसांनाही याबाबत कळवले होते. फ्रान्सिस यांना रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत घराबाहेरील एका खूर्चीवर बसवण्यात आले होते. मात्र, 3 तास उलटून गेल्यानंतरही रुग्णवाहिका न आल्याने फ्रान्सिस यांचा खूर्चीवरच मृत्यू झाला, अशी महिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले असताना रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत पुण्याचे रहिवाशी येसूदास. एम. फ्रान्सिस यांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाउन असतानाही काही भागात अवैध वाहतूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी ठिकठिकणी दगड लावून रत्ता आडवला जात आहे, अशी माहिती एका स्थानिक स्वयंसेवकांनी दिली आहे. जवळपास 3 तास कुटुंबियांनी रुग्णवाहिका क्रमांकावर संपर्क साधला होता, अशीही माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले होते. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने ते फारसे मदत करू शकले नाहीत. सध्या सोशल मीडियावर मृताच्या कुटुंबियांचे व्हिडिओ आणि फोटो अधिक वेगाने व्हायरल होत आहे. तसेच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- पुणे: कोरोना झाल्याच्या भितीने आत्महत्या केलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळेत रुग्णवाहिका न पोहचल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे, असा आरोप फ्रान्सिस यांच्या कुटुंबियातील सदस्य करत आहेत. तसेच फ्रान्सिस यांचा मृत्यूनंतर काही वेळात एक टेम्पो उपलब्ध झाला आणि त्यांना सरकारी रुग्णलयात नेण्यात आले. मात्र, तिथे फ्रान्सिस यांना मृत घोषीत करण्यात आले.