Private Bus Fares: पुण्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी खाजगी बसच्या भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

त्याचा खासगी बससेवेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी, सहसा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, आपण खाजगी बस सेवा पुरवठादारांकडून दुप्पट वाढ पाहतो, परंतु यावर्षी ही वाढ मंदावली आहे आणि दीडपटावर थांबली आहे.

Private Bus Operators (संग्रहित संपादित प्रतिमा)

उन्हाळ्याच्या सुटीत (Summer Vacation Season) खासगी बस पुरवठादारांनी (Private Bus Operators) बस भाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत विविध ठिकाणांहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे. खासगी बस वाहतूकदारांनी त्यांच्या भाड्यात 20 ते 25 टक्के वाढ केली आहे. डिझेलचे दर वाढल्याने हे भाडे वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थलांतरितांची मोठी लोकसंख्या आहे. बाहेरील शहरांमधील युवा वर्ग पुण्यात जॉब करत आहे, शिक्षण घेत आहे.

हे लोक प्रामुख्याने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, अकोला, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड या ठिकाणाहून पुण्यात स्थायिक झाले आहेत. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत या सर्व मार्गांवर खासगी बसचालकांनी तिकीट दरात वाढ केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

पुण्यातून दररोज सुमारे दोन ते अडीच हजार बसेस राज्याच्या विविध भागांत जातात. या मार्गावरून दररोज एक लाख प्रवासी प्रवास करतात. खासगी बसेस एसटी महामंडळाच्या बसच्या जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारू शकतात. यापेक्षा जास्त भाडे आकारल्यास परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते. अशा परिस्थितीत खासगी बसचालकांनी भाड्यात वाढ केली आहे, मात्र ती वाढ दीडपट नसल्याची खबरदारी घेतली आहे.

पुण्यातील वाकड, निगडी, पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, भोसरी, नाशिक फाटा, वारजे, वडगाव, कात्रज, पद्मावती, स्वारगेट, विश्रांतवाडी, शिवाजी नगर, वाकडेवाडी, हडपसर, येरवडा या भागांतून अशा बसेसची मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. पुणे ते मुंबई, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, नाशिक अशा कमी अंतराच्या ठिकाणी प्रवासी वाहतुकीसाठी एसटीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. (हेही वाचा: Barsu Refinery Protest: बारसू आंदोलनातील 8 गावकऱ्यांवरील 144(2) आदेश मागे घेण्यावर राज्य सरकार सशर्थ सहमत)

एसी बसेसचे तिकीट (आकडे रुपयात)-

पुणे-नागपूर: 1500- 2000

पुणे-अमरावती: 1400-1800

पुणे-रत्नागिरी: 900-1200

पुणे-कोल्हापूर: 500-700

पुणे-नाशिक: 500-700

पुणे-औरंगाबाद: 400-600

पुणे-लातूर: 700-1100

पुणे-नांदेड: 800-1400

दरम्यान, राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. त्याचा खासगी बससेवेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी, सहसा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, आपण खाजगी बस सेवा पुरवठादारांकडून दुप्पट वाढ पाहतो, परंतु यावर्षी ही वाढ मंदावली आहे आणि दीडपटावर थांबली आहे.