Rashmi Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस; 'त्या' फोनमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या
Rashmi Thackeray, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (कमी Uddhav Thackeray)यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. सध्या त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) यांनी थेट फोन करत रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध ताणलेले असताना मोदी यांच्याकडून ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांसह राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, त्यांना आराम पडावा आणि त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रश्मी यांना लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

रश्मी ठाकरे यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या त्यांना मुंबई येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रश्मी यांची कोरोना व्हायरस चाचणी 23 मार्च रोजी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि त्यांचे चिरंजव पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोना लस 11 मार्च रोजी घेतली होती. हा त्यांचा पहिला डोस होता. तरीही त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. दुसऱ्या बाजूला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोना व्हायरस ससर्ग झाला आहे. त्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

दरम्यान, अलिकडील काळात शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध फारसे बरे नाहीत. दोन्ही पक्षातील संबंध प्रचंड विकोपाला गेले आहेत. गेल्या काही काळात सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण आणि मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंमंत्र्यांवर केलेले आरोप यावरुन तर हे संबंध अधिकच बिघडले आहेत. अशा स्थितीत पंतप्रधान मोदी यांचा ठाकरे यांना फोन आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.