राष्ट्रपती पद निवडणूक (President Election 2022) तोंडावर आली आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापली रणनिती आखण्या सुरुवात केली आहे. या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेली शिवसेना (Shiv Sena) सहभागी होत आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे दुपारी तीनच्या सुमारास पार पडत असलेल्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई हे प्रतिनीधी म्हणून उपस्थित असतील. या बैठकीसाठी सुभाष देसाई हे मुंबईहून दिल्लीला रवानाही झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एखादा तगडा उमेदवार उतरवावा असा विरोधकांचा विचार आहे. हा उमेदवार म्हणून शरद पवार यांच्याकडेही पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर उमेदवार निश्चितीसाठी विरोधकांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ममता बॅनर्जी अग्रेसर आहेत. या बैठकीला काँग्रेस आणि शिवसेना आदी पक्षही सहभागी होत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या हालचालींना सहाजिकच बळ मिळू लागले आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खडगे आणि शरद पवार यांच्यातही मुंबई येथे नुकतीच एक बैठक पार पडली. (हेही वाचा, President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील ममता बॅनर्जींच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत; शिवसेनेने सांगितलं 'हे' कारण)
शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानीही मंगळवारी बैठकांचा सपाटा पाहायला मिळाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही दिल्ली येथे शरद पवार यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, या चर्चा सुरु असल्या तरी शरद पवार काय भूमिका घेतात याबाबत मोठी उत्सुकता आहे.
दरम्यान, राष्ट्रपती पदाची निवडणूक यंदा अधिक अटितटीची होईल अशी शक्यता आहे. केंद्रातील सत्तते असलेल्या भाजपकडे राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणावा इतके बहुमत नाही. त्यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जवळपास 20 हजार मतमूल्य कमी आहे. त्यामुळे हा कोटा पूर्ण करण्यासाठी भाजप कसा प्रयत्न करते यावर बरेच काही अवलंबून आहे.