मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits PTI)

पीएमसी बॅंकेमध्ये पैसे अडकलेल्या खातेदारांनी आज (11 ऑक्टोबर) ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ठाण्यात पालिका मुख्यालयाबाहेर खातेदारांनी मुख्यमंत्र्यांना गाठलं. यावेळेस माजी खासदार किरीट सोमय्या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर लगेच नरेंद्र मोदी यांच्यासोबत याविषयी चर्चा केली जाईल असं आश्वासन खातेदारांना दिलं आहे. तर सारे पैसे खातेदारांना पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असेही फडणवीस यावेळेस म्हणाले.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर मुख्यमंत्री प्रचार दौर्‍यांमध्ये आहेत. मागील काही दिवसांपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पीएमसी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादल्याने खातेदारांचे पैसे अडकले आहेत. यामुळे दिवाळसणासारखा मोठा सण अंधारात साजरा करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. तर विशेष ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर तपासाला वेग येईल असे देखील किरीट सौमय्या यांनी सांगितलं आहे. PMC बँक घोटाळाप्रकरणी धक्कादायक खुलासा, संचालक राकेश-सारंग वाधवान यांची लंडन आणि दुबई येथे प्रचंड संपत्ती

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे.