केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल लालबागचा राजा चरणी दर्शनात मग्न; मुंबई लोकल रेल्वे मार्गाच्या पाण्यात गटांगळ्या
पियुष गोयल (Photo Credits-Facebook)

मुसळधार पावसामुळे मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मुंबईकर व्यवस्थेला लाखोली वाहात मनस्ताप सहन करत स्टेशनच्या फलाटावर उभा आहे. रेल्वे रुळ पाण्यात गटांगळ्या खात आहे. अशा स्थितीत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) मात्र लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) चरणी दर्शनात मग्न आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या या दर्शनमग्नतेची दृश्य वृत्तवाहिन्या आणि इतर प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. त्यामुळे भर पावसात लालबागच्या राजा चरणी धाव घेतलेले पियुष गोयल गणपती बाप्पांकडे नेमकं काय मागणं मागत आहेत, असा सवाल विचारला जातो आहे. देवदर्शन करण्यात काहीच गैर नाही. परंतू, मुसळधार पावसाने मुंबईतील मध्य, हार्बर, आणि पश्चिम असे तीन्ही मार्ग बंद आहेत. अशा वेळी रेल्वे रुळावर आणायचे सोडून देवदर्शनात मग्न असलेल्या मंत्री गोयल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्त नवाब मलिक यांनी पियुष गोयल यांच्या लालबागचा राजा दर्शनावर जोरदार टीका केली आहे. देवदर्शन करण्यात काहीच गैर नाही. परंतु, वेळ काय आपण करतोय काय याचे भान सत्ताधाऱ्यांनी बाळगले पाहिजे. मुंबई रेल्वे जागेवर ठप्प झाल्याने मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना मंत्री महोदयांकडून मुंबई रेल्वेस्थितीचा आढावा घेऊन ती त्वरीत कशी सुरु करता येईल यासाठी प्रयत्न करणे आपेक्षीत होते. मात्र, तसे न होता हे सर्व केवळ मतांसाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठीच देवदर्शन केले जात असल्याचा आरोप, नवाब मलिक यांनी केला आहे.(Mumbai Rain: मुंबईत सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर)

तर मुंबईत सुरु असलेल्या अतिमुसधार पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकात दिसून येत आहे. मात्र याच स्थितीत पियुष गोयल हे देवदर्शनात मग्न असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता विरोधकांकडून गोयल यांच्यावर टीका केली जात आहे.