Pawar vs Pawar: लोकसभा, विधानसभा निवडणूकीसाठी घड्याळ अजित पवारांकडे तर तुतारी शरद पवारांकडे पक्ष चिन्ह; सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी
Sharad Pawar Party Symbol | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूटीनंतर आता पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह यांवरून सर्वोच्च न्यायालयात शरद पवार (Sharad Pawar)  आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये लढाई सुरू आहे. पण आगामी लोकसभा आणि त्यानंतर येणार्‍या विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार गटाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे पक्षचिन्ह देण्यात आले आहे. तर घड्याळ अजित पवारांकडे राहणार आहे. शरद पवार गटाला लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव वापरता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत.

अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुर्तास अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नये, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवले आहे. नक्की वाचा: Ajit Pawar Letter: अजित पवार महायुतीत का गेले? पत्राद्वारे स्वत:च दिले स्पष्टीकरण, पाहा काय म्हणाले .

दरम्यान घड्याळ या निवडणूक चिन्हामुळे मतदारांमध्ये गोंधळ टाळण्यासाठी अजित पवार यांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये पब्लिक नोटीस द्यावी. या नोटीसमध्ये घड्याळ हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे नमूद करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यावेळी अजित पवार गटाकडून आम्ही भविष्यात प्रचारामध्ये शरद पवार यांचा फोटो किंवा नाव वापरणार नाही, असे हमीपत्रही न्यायालयात जमा केल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 5 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 4 जून दिवशी होणार आहे.