Corona Virus च्या वाढत्या संक्रमणामुळे पंकजा मुंडे त्रस्त; कोरोनाचा सामना करण्यासाठी सांगितला उपाय
पंकजा मुंडे (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणूने (Corona Virus) भारतात प्रवेश केल्यावर हळूहळू विविध राज्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढत असलेला दिसून येत आहे. सध्या देशातील कोरोना विषाणूमुळे बाधित लोकांची संख्या 62 वर पोहचली आहे. पुण्यात (Pune) एकूण 5 जणांना याची लागण झाली असून, नायडू रुग्णालयात 10 जण निरीक्षणाखाली आहेत. प्रशासन यावर उपाययोजना करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, त्यात आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विचारांची भर पडत आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे पंकजा मुंडे त्रस्त असलेल्या दिसत आहेत. त्यांनी एक ट्वीट करत या विषाणूचा सामना करण्यासाठी काही उपायोजना सांगितल्या आहेत.

पंकजा मुंडे ट्वीट -

पंकजा मुंडे म्हणतात, ‘कोरोना रोखण्यासाठी फक्त मास्कच पुरेसे नाही, जोपर्यंत तापमान पुरेसे वाढत नाही तोपर्यंत आम्ही लोकांना घरातूनच काम करण्याची परवानगी का देऊ शकत नाही? तसेच विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी परीक्षासोडून शाळा-कॉलेज पूर्णतः बंद का करू शकत नाही? बाहेर जर का कमी लोक असतील, तर त्यामुळे गोंधळ कमी होईल व प्रशासनाला ही परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत मिळेल.’ (हेही वाचा: राजस्थानमध्ये 85 वर्षांच्या वृद्धाला कोरोना विषाणूची लागण; भारतात Corona Virus संक्रमित रुग्णांची संख्या 62)

दरम्यान, पुण्यात विषाणूचे 5 रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आज पुण्याच्या विभागीय आयुक्तांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांनी नायडू हॉस्पिटलमध्ये 17 संशयितपैकी 5 कोरोनाबाधित असल्याचे सांगितले. पुण्यात ज्या भागातील रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्या भागातील शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सध्या भारतात, जम्मू-काश्मीर 1, लडाख 2, राजस्थान 17, दिल्ली 4, महाराष्ट्र 5, यूपी 8, कर्नाटक 4, केरळ 17, तमिळनाडू 1 आणि तेलंगणामध्ये 1 अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.