Package For Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलेल्या 10 हजार कोटींच्या मदत पॅकेजचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत
Package For Maharashtra Farmers: राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज जाहीर केलेल्या 10 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून स्वागत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या या आस्मानी संकट काळात त्यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मोठा आधार देण्याची आवश्यकता होती. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना वर करणे गरजेचे होते. याच कारणास्तव ही भरीव मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्याचे काँग्रेस पक्षाकडून स्वागत करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
या बद्दल बोलताना थोरात म्हणाले की, राज्य सरकारने पिकांचे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये, मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे. फळपीक नुकसानीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये, रस्ते आणि पुलांसाठी 2 हजार 635 कोटी, ग्रामीण रस्ते व पाणी पुरवठ्यासाठी 1 हजार कोटी, नगर विकाससाठी 300 कोटी, महावितरण उर्जा विभागासाठी 239 कोटी, जलसंपदा विभागासाठी 102 कोटी रुपये, कृषी, शेती, घरांसाठी 5 हजार 500 कोटी रुपये असे एकूण 9 हजार 776 कोटी रुपयांचे हे मदत पॅकेज आहे. या मदतीमुळे शेतक-यांना पुन्हा उभे राहण्यास मोठी मदत होणार आहे.(Package For Maharashtra Farmers: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज केले जाहीर, दिवाळीपर्यंत दिली जाणार मदत)
तर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक अजूनही आलेले नाही. कोरोनामुळे राज्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. केंद्र सरकारकडून हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीतही शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता ही भरीव मदत राज्य सरकारने जाहीर केली असून दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. संकटकाळात राज्यसरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे ही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2020 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

