लस घेतली नसेल तर औरंगाबादेत पेट्रोल, गॅस, रेशन मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोना वैक्सीन (Photo credits: PTI)

महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा प्रशासनाने दुकाने, गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपांना केवळ कोविड-19 लसीचा किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांनाच किराणा सामान आणि इंधन पुरवठा करण्यास सांगितले आहे. लसीकरणाच्या बाबतीत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद २६ व्या क्रमांकावर असल्याचे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 55 टक्के पात्र लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर राज्यातील 74 टक्के लोकांना लसीकरण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हे ही वाचा Corona Vaccination: महाराष्ट्रात 10 कोटींहून अधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण.)

मंगळवारी रात्री जारी केलेल्या आदेशात औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  यांनी  दुकाने, गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपाच्या अधिकाऱ्यांना ग्राहकांची लसीकरण प्रमाणपत्रे पाहण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास औंरगाबाद प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीच्या रोग कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार, असे ते म्हणाले आहे.

ज्यांना कोविड प्रतिबंधक लसीचा एकही डोस मिळालेला नाही त्यांना औरंगाबादच्या ऐतिहासिक स्थळे आणि वास्तूंमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेने संध्याकाळीही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी सुधाकर शेकळे यांनी पीटीआयला सांगितले की, “बरेच लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करतात. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत जिल्हा परिषदेतर्फे त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.