No Helmet, No Petrol Campaign in Nashik: पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये आजपासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेचा शुभारंभ
No Helmet, No Petrol Campaign in Nashik (Photo Credits: Pixabay & Wikimedia Commons)

आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत नाशिक (Nashik) शहरामध्ये 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' (No Helmet, No Petrol) मोहिमेला सुरुवात झाला. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले. आमदार सरोज अहिरे आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी हेल्मेट घालून पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आपल्या गाडीत पेट्रोल भरून घेत मोहिमेला प्रारंभ केला.

आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालवितांना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि त्याचदृष्टीकोनातून ही मोहिम सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मागील 5 वर्षात 782 अपघातात 825 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 467 दुचाकीस्वार असून त्यापैकी 397 जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे, असेही भुजबळ म्हणाले. त्यामुळे अपघातामुळे जीव वाचवण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.

नागरिकांचा जीव वाचवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. मात्र सर्व नियमांचे पालन करुन नागरिकांनी ही मोहिम यशस्वी करायला हवी. यासाठी सर्व पेट्रोल पंपावर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या मोहिमेच्या जनजागृतीसाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावण्यात येणार आहे. तसंच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 2 हजार 53 हेल्मेट उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.