Coronavirus च्या भीतीने गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना आमदार नितेश राणे यांची सुरक्षित राहण्याची विनंती; पहा ट्विट
Nitesh Rane (Photo Credits: PTI)

देशासह महाराष्ट्र राज्याला विळखा घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) नागरिक चिंतेत आहेत. सरकारकडून खबरदारीसाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असताना नागरिकही सुरक्षित राहण्यासाठी आपल्या मूळ गावी जात आहेत. कोरोना व्हायरसच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह काही शहरातील ऑफिसेस बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सुट्ट्या असल्याने चाकरमानी कोकणाकडे धाव घेत आहे. मात्र अशा नागरिकांना भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक विनंती केली आहे. ट्विट करत त्यांनी कोकणवासियांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. (मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे मूळ गावी परतण्यासाठी नागरिकांची रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी)

नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, "सलग सुट्ट्यांमुळे आपल्या गावाकडे म्हणजेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग कडे निघालेल्या चाकरमान्यांना माझी एक नम्र विनंती आहे. ही वेळ सुट्टीची नसून आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे. त्यामुळे लोकांनी गावी न येता मुंबईत आपल्या घरी राहावे. गावी आल्याने येथे व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे."

नितेश राणे ट्विट:

कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक लोकल ट्रेन्ससह लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापूर्वीही अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवास करणे त्रासदायक होऊ शकते. तसंच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीपासून लांब राहण्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळेच प्रवास टाळाणे आणि घरी सुरक्षित राहाणे हेच हितावह ठरेल.