महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर नितेश राणे यांचा भाजप प्रवेश
नितेश राणे (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार असल्याने जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आज (3 ऑक्टोंबर) अखेर नितेश राणे यांनी भाजप प्रवेश केला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच नितेश राणे यांना कणवली येथून उमेदवारी देण्यात यावी अशी नारायण राणे यांची इच्छा आहे. भाजपच्या यादीत नितेश राणे यांचे नाव असण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे.

नितेश राणे यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीवेळी काँग्रेसकडून त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी नितेश राणे यांनी भाजप आमदार प्रमोद जठार यांना हरवत विजय मिळवला होता. तर नारायण राणे यांनी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष ही भाजपात विलिन करणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र फक्त नितेश राणे यांचाच भाजपात प्रवेश केला आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूकीसाठी नितेश राणे यांना भाजप कणकवली मधून उमेदवारी देणार?)

ANI Tweet:

काही महिन्यांपूर्वी नितेश राणे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामध्ये नितेश राणे यांनी कणकवलीत मुंबई-गोवा राजमार्गावरील खड्ड्यांवरुन उपअभियंता याला पुलाला बांधून त्याच्यावर चिखल फेकताना दिसून आले होते. या प्रकरणी वाद वाढल्याने नितेश राणे यांनी स्वत:हून कणकवली पोलिसात जाऊन गुन्हा कबूल केला होता. तसेच नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या वागण्यावर माफी सुद्धा मागितली होती.

मात्र दुसऱ्या बाजूला भाजप पक्षाने मंगळवारी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 125 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या उमेदवारीच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे नाव सामील आहे. पण हायवोल्टेज प्रोफाइल एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचे यादीतून नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या दुसऱ्या यादीतून ही एकनाथ खडसे यांना वगळण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.