
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Elections) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तसे स्पष्ट केले आहे. मलिक यांनी म्हटले आहे की, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत असले तरी, महापालिका, जिल्हा परिषद (Zilla Parishad Election 2021), पंचायत समिती आणि नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही आघाडी करण्याबाबत कोणत्याही पक्षाची भूमिका नाही. या निवडणुका स्थानिक परिस्थितीनुसारच पार पडतील. आवश्यक तेथे युती, आघाडी केली जाईल. राष्ट्रवादीचा भर हा स्वबळावर लढण्याचा असेल. नवाब मलिक हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवाब मलिक यांनी सांगितले की, प्रत्येक पक्षाला आपला जनाधार वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात अशी महाविकासाघाडीतील कोणत्याही पक्षाची भूमिका नाही. त्यामुळे हे तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर वेगवेगळे लढतील. इतकेच नव्हे तर आवश्यक त्या ठिकाणी आघाडी करतानाही दिसतील. (हेही वाचा, Congress: कपिल सिब्बल यांच्या घरी शरद पवार यांच्या उपस्थितीत विरोधकांचे स्नेहभोजन, गांधी कुटुंबीयांच्या काँग्रेस नेतृत्वावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह)
पक्षसंघटना आणि स्थानिक पदाधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतील. त्यानुसारच पक्षाची भूमिका ठरेन, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. भाजप हा आमचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र, सर्वच ठिकाणी भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होईल अशी स्थिती नाही. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना तर काही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असेही चित्र पाहायला मिळू शकते, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्याती सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कोरोना महामारिमुळे निवडणुक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. अनेक ठिकाणी निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.