ठाकरे सरकारला अस्थिरतेचा धोका किती? शरद पवार यांनी दिले उत्तर
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार अस्थीर असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यातच भाजप खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आपोआप कोसळेन अशी टीका केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष आणि महाविकासआघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र विरोधकांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार पूर्णपणे स्थिर आहे. आम्ही सर्वजण या सरकारप्रती कटीबद्ध आहोत. सर्व आमदार या सरकार सोबत आहेत, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार यांच्याशी संवाद साधून एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, महाविकासआघाडी सरकारमधील सर्व आमदार सरकारसोबत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिनही पक्ष आपापसात समन्वय साधून काम करत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधान आले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. (हेही वाचा, Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात बैठक, राजभवनावर राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या; चर्चांना उधान)

विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या स्थितीत उतावळे झाले आहेत. पण, त्याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील सरकारला काहीही धोका नाही. एखाद्या आमदाराने फुटून जाण्याचा विचार केलाच तर जनता त्याला माफ करणार नाही. सरकारमधून बाहेर पडत सरकार अस्थिर करण्याचे कोणत्याही आमदाराचे वर्तन जनतेला आवडणार नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासोबत कोविड 19 आणि राजकारण यावर कोणतीही चर्चा झाली नाही. ती केवळ एक शिष्टाचार भेट होती. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही नेहमीच बेटत असतो. खास करुन आम्ही महापौर निवसस्थान येथे भेटत असतो. मात्र या वेळी आम्ही निवासस्थान मातोश्री येथे भेटलो, असेही शरद पवार यांनी सांगितले.