गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रातील लेकींना सुरक्षेची हमी दिल्याबद्दल NCP खासदार सुप्रिया सुळे यांनी मानले आभार
Anil Deshmukh and Supriya Sule (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसच्या रुपात महाराष्ट्रात आलेला हा विषाणू संपूर्ण महाराष्ट्राला पोखरून काढत आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. घराबाहेर पडू नका असे वारंवार सांगूनही काही टवाळकी करणारी मुले रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहे. यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. यासंबंधीचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. अनिल देशमुख यांच्या या भूमिकेचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात महिलांवर अत्याचार, विनयभंग करणा-यांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. आपल्या महाराष्ट्रातील लेकींना सुरक्षेची हमी दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी अनिल देशमुख यांचे आभार मानले आहेत. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 2064 कोरोनाग्रस्त रूग्ण; 82 नव्या Covid 19 बाधितांची आज भर!

पाहा ट्विट:

महाराष्ट्रात आज 82 नवे रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 2064 झाली आहे. यात मुंबईतील 59 नव्या रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला असून रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1399 वर पोहचला असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई तसेच उपनगरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतामध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा 9152 पर्यंत पोहचला आहे. त्यापैकी 7987 जणांवर उपचार सुरू असून 856 लोकांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. तर 308 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.