राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
NCP MLA Babajani Durrani (PC - Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी (MLA Babajani Durrani) यांची कोरोना चाचणी (Corona Test) आज पॉझिटिव्ह (Positive) आली आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रशासनाकडून बाबाजानी दुर्राणी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतल्या जात आहे. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मात्र, आता राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - Coronavirus: पुण्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मदत)

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील पंधरवड्या औरंगाबादमधील शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असे या नगरसेवकांचे नाव होते. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांनी 10 हजाराचा टप्पा पार केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 84 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 166 वर पोहोचली आहे. त्यापैकी 5861 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 387 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 3 हजार 918 जणांवर रुग्णालयाच उपचार सुरु आहेत.