Navi Mumbai: ऑनलाईन फ्रेंडकडून महिलेची फसवणूक; घातला 7 लाखांचा गंडा
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

फेसबुक फ्रेंडने (Facebook Friend) पनवेल (Panvel) येथे राहणाऱ्या एका महिलेची तब्बल 6.69 लाखांना फसवणूक केल्याची घटना समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडिया रिपोर्टनुसार, ब्रिटिश नागरिक (British National) असल्याचे भासवत आरोपीने महिलेसोबत फेसबुकद्वारे मैत्री केली. त्यानंतर तिला सोन्याच्या बांगड्या, पर्स, कपडे इत्यादी गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. मात्र त्यासाठी भरावी लागणारी कस्टम ड्युटी आणि इतर चार्जेससाठी त्याने तिच्याकडे 6.69 लाखांची मागणी केली. हे भरल्याशिवाय तुझ्या घरी गिफ्ट्स पोहचू शकणार नाही, असंही त्याने सांगितले आणि दिल्ली एअरपोर्टवर अडकून पडलेले गिफ्टस घरपोच करण्यासाठी लाखो रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात फेसबुकवर Tony Mike या नावाने महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती तिने स्वीकारली. त्यानंतर Mike ने तिच्यासाठी गिफ्ट पाठवणार असल्याचा मेसेज तिला केला. मात्र  तिचे गिफ्ट दिल्ली एअरपोर्टवर अडकून पडल्याचे त्याने तिला सांगितले. ते गिफ्ट मिळवण्यासाठी आणि तिच्या घरापर्यंत डिलिव्हर होण्यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्याने हळूहळू तिच्याकडून वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली एकूण 6.69 लाख वेगवेगळ्या अकाऊंट्सला ट्रान्सफर करुन घेतले. (Navi Mumbai Online Fraud: नवी मुंबईत 21 वर्षीय तरुणीची 2 लाखांची ऑनलाइन फसवणूक, आरोपीचा शोध सुरू)

तिने जानेवारी 2021 पर्यंत सर्व पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाईल फोन स्विच ऑफ केला. त्यामुळे त्याला संपर्क करणे महिलेला अशक्य झाले. अखेर महिलेने खांडेश्वर पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) 406 (गुन्हेगारी उल्लंघन ट्रस्ट), 420 (फसवणूक) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्तगत गुन्हा दाखल केला आहे.