Navi Mumbai: गाड्या भाडेतत्त्वावर घेऊन अनेकांना घातला 1.3 कोटींचा गंडा; आरोपी अटकेत
Arrest | Representational Image | (Photo Credits: File Photo)

नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) 1.3 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी लोकांच्या गाड्या भाडे तत्त्वावर घेत असे आणि ती गाडी स्वत:च्या मालकीची आहे, असे दाखवून इतरांना विकत असे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या गाडी विकण्याच्या घोटाळ्यामध्ये त्याने अनेकांना तब्बल 1.3 कोटी रुपयांना फसवले आहे. (Thane: चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 8 कोटींची फसवणूक; Jewellery Firm च्या मालकाला अटक)

फसवणूक झालेल्या एका पीडित व्यक्तीने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपीविरुद्ध कलम 420 आणि आयपीसीच्या इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीचे नाव वैभव अनंत कोळी असे असून त्याला मागील आठवड्यात अटक करण्यात आली. आतापर्यंत या आरोपीने एकूण 11 गाड्यांची विक्री केली आहे. या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या असून या गाड्यांची एकूण किंमत 1.36 कोटी रुपये इतकी आहे.

आरोपी लोकांच्या गाड्या भाड्यावर चालवण्यासाठी घेत असे आणि त्यानंतर या गाड्या आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने इतर व्यक्तींना विकत असे. कोळीच्या इतर दोन साथीदारांचा शोध सध्या सुरु असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, अशाच प्रकारच्या एका घटनेत वाशी पोलिसांनी मागील महिन्यात एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली होती. एका कार रेन्टल कंपनीला तब्बल 72.90 लाख रुपयांचा गंडा घालून हा व्यक्ती दुबईला पसार होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून एकूण 23 गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.