शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीने हल्ला
शिवसेना आमदार तुकाराम काते (संग्रहित प्रतिमा)

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यातून काते थोडक्यात बचावले. मात्र, त्यांचे दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले. नवी मुंबईतील मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री १२. ३० च्या सुमारास ही घटना शुक्रवारी घडली. देवीच्या मंडपात बसलेल्या काते यांच्यावर पाच ते साह जणांनी तलवार हल्ला केला.

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोसाठी कारशेड बनविण्याचे काम सुरु आहे. या कामामुळे स्थानिक नागरिकांना सतत विविध त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हे काम थांबवण्यात यावे. या कारणासाठी आमदार काते यांनी शिवसेनेच्या वतीने दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते.

दरम्यान, कामाला विरोध केल्यामुळेच मेट्रोच्या कंत्राटदारांनी हा हल्ला केला असावा, असा आरोप काते यांनी केला आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ५ अज्ञातांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा,राफेल डील: 'काहीच उरले नाही, आता काय लपवणार? चेटूकगिरी करुनही भूत उतरणार नाही!')

दरम्यान, आमदार काते यांच्यावर तलवार हल्ला झाल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.