Nashik: कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या 24 मुलांना मिळणार 5 लाखांची मदत
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोविड-19 (Covid-9) मुळे पालक गमावलेल्या 18 वर्षांखालील 24 मुलांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नाशिकच्या जिल्हाधिकारी सूरज मंधारे (Suraj Mandhare) यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीस जिल्हा बाल संरक्षण आणि संरक्षण कार्य दल नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीत कोविडमुळे अनाथ झालेल्या 24 मुलांना 5 लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या 18 वर्षाखालील मुलांना प्रत्येकी 5 लाखांची मदत करण्यात येणार आहे. ही मुलं मोठी होईपर्यंत फिक्स डिपॉझिटच्या स्वरुपात करण्यात येईल, असे मंधारे यांनी सांगितले. (कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत देण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट; केल्या 'या' मागण्या)

ही एफडी मुलं आणि महिला व बाल विकास कार्यालय या दोघांच्या नावे जॉईंट असेल. बाल संगोपन योजनेअंतर्गत या मुलांच्या नावे दर महिन्याला 1100 रुपये जमा करण्यात येतील. या मुलांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास त्यांनी मुलांना सरकारी बालगृहात पाठवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसंच  नातेवाईंकांवर स्वत: जबाबदाऱ्या असल्याने या मुलांच्या संगोपनाचा भार त्यांच्यावर पडू नये, असेही ते म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील तब्बल 861 मुलांनी कोविडमुळे आपले पालक गमावले आहेत. त्यापैकी 24 मुलं 18 वर्षांखालील आहेत. तर उर्वरीत 778 मुलांनी एक पालक गमावला आहे, असे जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी सांगितले आहे.

पालक गमावलेल्या एकूण 396 मुलांपैकी बाल संगोपन योजनेचे लाभ मंजूर करण्यात आले आहेत आणि त्यांना दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शिधापत्रिकाही देण्यात येत आहेत.