Zero Covid19 Cases in Nagpur: नागपूर मध्ये दीड वर्षानंतर शून्य कोरोना रुग्णांची नोंद
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत आहे. यातच आता अजून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर आता नागपूर (Nagpur) जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात आज शुन्य कोरोना रुग्णांची नोंद झाली. तब्बल दीड वर्षानंतर नागपूरमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.  (First Covid-19 Free District: भंडारा ठरला महाराष्ट्रातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा)

जिल्ह्यात मागील 24 तासांत एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. तर केवळ 183 सक्रीय रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट 97.91 टक्के इतका आहे. दरम्यान, 11 मार्च 2020 मध्ये नागपूर मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. मात्र आता आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

नागपूरकरांनी कोरोनावर मिळवलेल्या या यशावर पालकमंत्री नितीन राऊत यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसंच ही स्थिती कायम राखण्याची अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर परिस्थिती बिघडू नये म्हणून अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला असून नागपूर ही कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यात लसीकरणही सुरु आहे. विशेष म्हणजे पॉझिटीव्ही रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, अशा परिस्थितीत गाफिल न राहता कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.