नागपूर मधील कन्हान नदीत स्नानासाठी गेलेल्या 5 तरुणांचा बुडून मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI))

नागपूर (Nagpur) मधील कन्हान नदीत (Kanhan River) 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. 17-23 वयोगटातील ही पाच मुले होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील दिग्रस (Digras) येथे राहणारे जवळपास 12 तरुण नागपूरमध्ये फिरण्यासाठी आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आले होते. (Uttarakhand: पिकनिकसाठी गेलेले मुंबईतील 3 विद्यार्थी गंगा नदीत बुडाले)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हे तरुण यवतमाळवरुन नागपूरला येण्यासाठी निघाले. नागपूरला पोहचल्यानंतर ते ताजबघला गेले. तिथे सुरु असलेल्या बाबा ताज उत्सवात त्यांना सहभागी व्हायचे होते. दरम्यान तरुण कन्हान नदी स्नान करण्यासाठी आले होते आणि तिथून त्यांना पुढील उत्सवासाठी जायचे होते. 5 पैकी 4 जण नदीमध्ये पोहण्यास गेले. तर एकजण नदीकाठी बसून होता. त्यांचे इतर 7 मित्र गाडीमध्ये बसून त्यांची वाट पाहत होते. (दापोली: आंजर्ले समुद्र मध्ये 6 पुण्याचे पर्यटक बुडाले; स्थानिकांच्या मदतीने 3 जणांना वाचवण्यात यश)

मात्र बराच वेळ ते बाहेर न आल्याने शोधशोध सुरु झाली. पोलिसांनी स्थानिक डायव्हर्स आणि स्विमर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. अशी माहिती नागपूरच्या ग्रामी विभागाचे अतिरिक्त एसपी राहुल माकणीकर यांनी दिली. तसंच शोध घेण्यासाठी SDRF ला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी कन्हान पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फिरण्यासाठी, पिकनिकसाठी बाहेर पडलेल्या मुलांच्या अपघाती मृत्यूच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, पाहतो. त्यामुळे फिरण्यासाठी गेल्यानंतर मज्जामस्ती करताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वाहनं जपून चालवणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, पोहणे, ट्रेकसाठी गेले असता अशा अनेक ठिकाणी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.