Mumbai Shocker: भांडुप रुग्णालयात महिलेच्या प्रसूतीदरम्यान वीजपुरवठा खंडित; टॉर्चच्या प्रकाशात केली शस्त्रक्रिया, आई आणि नवजात बाळाचा मृत्यू
Operation Theatre | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

रुग्णालयांमध्ये विविध आरोग्य सेवांच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या मृत्यूंच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील बऱ्याच घटना सर्वसामान्यपणे ग्रामीण भागातून समोर येतात. मात्र आता मुंबईतील (Mumbai) भांडुप येथील महापालिकेच्या रुग्णालयात अशीच एक भयानक घटना घडली असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. या ठिकाणी प्रसूती गृहात मुलभूत सुविधांअभावी 26 वर्षीय महिला आणि तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.

भांडुप येथील सुषमा सूरज पालिका प्रसूती रुग्णालयात चक्क टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती करण्यात आली. यामध्ये नवजात बाळाचा मृत्यू झाला, त्यानंतर गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात एकच गोंधळ घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप येथील सुषमा सूरज पालिका प्रसूती रुग्णालयात एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. सिझेरियन ऑपरेशन दरम्यान बाळ मृतावस्थेत आढळले. पुढे शस्त्रक्रियेदरम्यान अचानक रुग्णालयातील दिवे गेले. त्यामुळे डॉक्टरांनी टॉर्चच्या साहाय्याने महिलेची प्रसूती केली. यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक झाली. मात्र डॉक्टरांनी टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया तशीच चालू ठेवली. प्रकृती आणखी खालावू लागल्याने अखेर महिलेला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. (हेही वाचा: Borewell Cable Catches Fire: बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने महिलेचा मृत्यू, अंबड येथील घटना

सायन रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला आणि डॉक्टरांना जाब विचारला. त्याला डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. उत्तर-पूर्व मुंबई उपनगरात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा स्थितीत या भागातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

महिलेचे कुटुंबीय आणि भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका, जागृती पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. घटनेबाबत जागृती पाटील यांनी भांडुप पोलीस स्टेशन आणि स्थानिक बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. रुग्णालयात या आधीची अशा घटना घडल्याचा दावा त्यांनी केला. कुटुंबीयांच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.चंद्रकला कदम यांनी सांगितले.