महाराष्ट्र: मुंबईत 2 किलोमीटरचा नियम सांगत तब्बल 40 हजारांपेक्षा अधिक गाड्या जप्त केल्याने राम कदम यांनी साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य- फेसबुक )

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) राज्यात प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील नागरिकांना घरापासून 2 किमी पेक्षा अधिक अंतरावर जाता येणार नाही असे पोलिसांनी आवाहन केले होते. मात्र हा नियम लागू केल्यानंतर मुंबईतील नागरिकांनी याचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांकडून तब्बल 40 हजारांपेक्षा अधिक गाड्या जप्त केल्या आहेत. त्यावरुन आता भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.(Mumbai Police Uses 'Know a Spot' Trend: 2 किमी पेक्षा जास्त अंतरावर गाडी नेल्यास मुंबई पोलिसांकडून होऊ शकते कारवाई, ट्विटद्वारे दिली चेतावणी)

राम कदम यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने 2 किमीचा नियम सांगून 40 हजारांपेक्षा अधिक गाड्या मुंबई पोलिसांनी जप्त केल्या. तसेच गाड्या जप्त करण्यासह मोठा दंड सुद्धा स्विकारला आहे. त्यामुळे आधीच खिशात पैसे नाहीत त्यातून महाविकास आघाडी सरकारची अशा पद्धतीची दादागिरी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.(मुंबईतील स्थानिकांनी घरापासून 2 किमी पेक्षा अधिक अंतरावर जाण्याचे टाळावे, मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन)

मिशन बिगीन अगेन नुसार आता महाराष्ट्र सरकारने काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोना व्हायरसचा धोका अद्याप कायम असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. परंतु काही जणांकडून या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांमुळे अन्य जणांना सुद्धा याचा त्रास होत आहे. याच कारणास्तव सर्व नागरिकांना लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सुचनांचे कठोरपणे पालन करावे असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे

दरम्यान, मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास रुग्णांचा आकडा 82074 वर पोहचला असून 52392 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच 4762 जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याकडे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते.