Mumbai: प्री-वेडिंग फोटो आणि व्हिडीओबाबत नाराज वधूला 50,000 नुकसान भरपाई देण्याचे आदेश; जाणून घ्या नक्की काय घडल 
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

लग्नाआधीचे प्री-वेडिंग फोटो-व्हिडीओ (Pre-Wedding Photos) हे कोणत्याही जोडप्यासाठी फार महत्वाचे असतात. मात्र कंपनीकडून आपले लग्नाआधीच फोटो आणि व्हिडीओ खराब झाल्याने नाराज वधूने आयोगाकडे धाव घेतली आहे.  लग्नाच्या सहा महिने अगोदर, नेरळ येथील रहिवासी नेहा करंगुटकरने मार्च 2019 मध्ये होणारे लग्न आणि हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ यांचे काम एका वेडिंग फोटोग्राफी फर्मला दिले होते. प्री-वेडिंग शूटसाठी तिने गेटवे ऑफ इंडिया येथून एक खाजगी यॉटही भाड्याने घेतली होती.

हे प्री-वेडिंग शूट अरबी समुद्रातील एका ठिकाणी नियोजित होते. परंतु कंपनीच्या सॉफ्टवेअर समस्येमुळे तिचे अर्धे प्री-वेडिंग शूटचे फोटो आणि व्हिडीओ खराब झाले. आता झालेल्या गोष्टीबाबत नुकसान भरपाई म्हणून या महिन्याच्या सुरुवातीला ग्राहक आयोगाने या फार्मला तिचे 50,000 रुपये परत करण्याचे आदेश दिले. कॉन्फेटी फिल्म्सने, तिची नुकसानभरपाई आणि खटल्याचा खर्च अनुक्रमे 5,000 आणि 2,000 रुपये देण्याचे आदेशही आयोगाने दिले.

आपले लग्नाआधीच फोटो आणि व्हिडीओ खराब झाल्याने नाराज वधूने तक्रार केली होती की, कराराच्या अटींनुसार, फर्मने तिला रॉ आणि एडीटेड फोटो तसेच हाय रिझोल्यूशनचे फोटो आणि व्हिडीओ देण्याचे मान्य केले होते. परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे प्री-वेडिंग शूटच्या फोटोंच्या सॉफ्टवेअर फाइल्स खराब झाल्या. यातील इतर फोटोंबाबतही नेहा खूश नव्हती. हे फोटो हाय रिझोल्यूशन नव्हते तसेच ते व्यवस्थित एडीट केले नव्हते.

याबाबत तिने फर्मशी संपर्क साधल्यावर त्यांनी 74,000 पैकी 56,000 रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु हा परतावा कधीच दिला गेला नाही. याबाबत नोटीस देऊनही फर्म आयोगासमोर हजर झाली नाही आणि त्यामुळे तक्रारदाराच्या व्हर्जनला आव्हान दिले गेले नाही. यावेळी आयोगाने असेही नमूद केले की, नेहाने पुरावा म्हणून सादर केलेल्या इमेलमधून संपूर्ण चित्र उभे राहत नाही. या ईमेलमध्ये फक्त तिची उत्तरे होती. तिच्या तक्रारीवर विश्वास ठेवणे कठीण होते कारण, तिने तक्रारीसोबत फोटो जोडले नव्हते. (हेही वाचा: Crime: तीन हजार रुपयांवरून झालेला वाद पोहोचला विकोपाला, नातवाकडून आजोबांची हत्या)

शेवटी असे ठरले की, इमेलमध्ये फर्मने परतावा देण्याचे आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण केले नाही. आयोगाच्या सदस्या प्रीती चामिकुट्टी यांनी मत व्यक्त केले की, फर्मच्या चुकीमुळे करंगुटकरांच्या लग्नाआधीचे अर्धे फोटो खराब झाले व फर्ममध्ये मान्य केल्याप्रमाणे त्यांनी नेहाला पैसे परत करावेत.