COVID-19 Outbreak: मुंबईत आढळले वुहानपेक्षा अधिक रुग्ण; तर, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने चीनलाही टाकले मागे
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे
भारतात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईतील (Mumbai) कोरोनाबाधितांच्या संख्येने आज 51 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर महाराष्ट्रात 90 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. चीन (China) येथील वुहान (Wuhan) शहरात डिसेंबर महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. वुहान येथील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 333 इतकी आहे. तर, संपूर्ण चीनमध्ये एकूण 83 हजार 43 रुग्ण सापडले आहेत. या आकडेवारीनुसार, वुहान शहाराच्या तुलनेत मुंबईत 700 अधिक रुग्ण झाले आहेत. एकट्या महाराष्ट्रात चीनपेक्षा 7 हजार 744 जास्त कोरोनाबाधित सापडले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 878 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 758 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 22 हजार 942 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 90 हजार 787 वर पोहचली आहे. यापैकी 3 हजार 289 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 42 हजार 638 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- मीरा भाईंदर: शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू
सर्व प्रथम चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या 83 हजार 43 वर आहे. यापैकी 4 हजार 634 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 78 हजार 351 जणांनी कोरोनावर मात केली आहे.